दरवर्षी भारतात, राष्ट्रीय पर्यटन दिन – हा 25 जानेवारीला साजरा केला जातो. भारतीय वार्षिक सकल उत्पन्न (GDP) वृद्धीसाठी पर्यटनाचे असलेले महत्त्व लोकांपर्यंत पोहोचावे यासाठी हा राष्ट्रीय पर्यटन दिन/दिवस साजरा केला जातो. 1980 च्या दशकापासून आधुनिक भारतीय पर्यटनास खरी सुरुवात झाली असे म्हणता येईल. पर्यटनामुळे येणारा परदेशी पैसा हा भारतीय अर्थसत्तेला अधिक बळकटी देत असतो आणि जागतिक बाजारपेठेत आपल्या देशाला प्रगतीपथावर ठेवतो. म्हणून इतर देशांप्रमाणे भारतानेही पर्यटनाचा पुरस्कार केला आहे. आग्नेय आशिया आणि युरोपियन देशांनी पर्यटनाची सुरुवात आपल्याही अगोदरच्या दशकांमध्ये करून हे दाखवून दिले होते की, पर्यटनाद्वारे रोजगाराच्या भरपूर संधी निर्माण करून विकसनशील देश हे आपले आर्थिक चलनवलन स्थिर करतात.

भारतातील सांस्कृतिक पर्यटनासोबत, वारसा, धार्मिक, वन्यजीव, कृषी-पर्यटन, पर्या-पर्यटनानी यांसाठी परदेशी पर्यटकांना नेहमीच आकर्षित केले आहे. डेक्कन ओडिसी, पॅलेस ऑन व्हील्स, महाराजाज् एक्सप्रेस, द गोल्डन चॅरियट, रॉयल राजस्थान ऑन व्हील्स यासारख्या अनेक अलिशान रेल्वेंनी भारतीय पर्यटनात आणि पाहुणचारामध्ये अधिक भर घातली आहे.

पर्यटन क्षेत्रातील महत्वाच्या घडामोडी

आजच्या या राष्ट्रीय पर्यटन दिनानिमित्त गतवर्षीच्या एकूण पर्यटन क्षेत्रातील महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा घेणे उचित ठरेल.

  • परदेशी पर्यटक आगमनामध्ये जानेवारी-नोव्हेंबर 2018 मध्ये एकूण 93,67,424 पर्यटक भारतात आले. तुलनेने जानेवारी-नोव्हेंबर 2017 मध्ये एकूण 88,67,963 पर्यटक भारतात आले होते. म्हणजेच एकूण 5.6% ने परदेशी पर्यटक आगमन (Foreign Tourist Arrivals -FTA)मध्ये वाढ दिसून आली.
  • गतवर्षामध्ये ई-टुरिस्ट व्हिसा मध्ये एकूण 41.5% ने वाढ दिसून आली. ही वेगाने होणारी वाढ पर्यटनातील उपलब्ध संधीचे निदर्शक आहे.
  • विदेशी विनिमय कमाई (foreign exchange earnings-FEE) भारतात जानेवारी-ऑक्टोबर 2018 मध्ये एकूण रु. 1,58,846 करोड आहे. तुलनेने ऑक्टोबर 2017 मध्ये एकूण रु. 1,41,965 करोड  भारतात आले होते. म्हणजेच परकीय चलनाच्या आवकमध्ये एकूण 11.9% ची वाढ झाली आहे.
  • स्वदेश दर्शन या अभियानांतर्गत वेगवेगळ्या 7 नवीन थीम आधारित परीक्रमांसाठी रु. 5873.99 करोड खर्चाचे 73 प्रकल्प मंजूर केले आहेत. त्यामुळे पर्यटनासाठी लागणाऱ्या मुलभूत सुविधांमध्ये वाढ होईल. येत्या वर्षांमध्ये रस्ते आणि पर्यटनासाठी स्थानिक विकासावर अधिक भर असेल.
  • प्रसाद (PRASAD -National Mission on Pilgrimage Rejuvenation and Spiritual, Heritage Augmentation Drive) या अभियानांतर्गत एकूण २४ धार्मिक स्थळांना मंजुरी दिली आहे. यामध्ये धार्मिक गावे, शहरे आणि स्थळांचा पर्यटनाच्यादृष्टीने विकास करण्यासाठी रु. ७२7.१६ करोड मंजूर झाले आहेत. त्यामध्ये वाराणसी, गया, द्वारका, अमरावती यासारख्या शहरांची नावे प्रसाद अभियानाच्या सुरुवातीपासूनच आहेत.
  • वारसा दत्तक योजना ही 2017 मधील पर्यटनासाठी सुरु केलेली योजनेंतर्गत अनेक वारसा स्थळे दत्तक गेली आहेत. त्यामध्ये लाल किल्ला, जंतरमंतर, कुतुबमिनार (नवी दिल्ली), गंगोत्री आणि गोमुख (उतराखंड) , हम्पी (कर्नाटक), अजिंठा (महाराष्ट्र) यासारखा अनेक वारसास्थळांचा समावेश आहे.
  • भारत पर्व, पर्यटन पर्व, इंडिया टूरिझम मार्ट, इंटरनॅशनल बुद्धिस्ट कॉन्क्लेव्ह यासारख्या अनेक उपक्रमांचा उपयोग करून घेऊन पर्यटनामध्ये वृद्धी करण्यात भारतीय पर्यटन मंत्रालय आणि सांस्कृतिक मंत्रालय यशस्वी ठरत आहे.
  • स्वच्छ भारत अभियानाचा खास प्रभाव पर्यटनावर दिसून येत आहे. त्यामुळे प्रतिष्ठित पर्यटन स्थळांच्या स्वच्छतेवर अधिक भर आहे.

अनेक योजना आणि उपक्रमांतर्गत पर्यटनाचा विकास आणि रोजगार निर्मिती यावर सरकारचा अधिक भार आहे हे स्पष्ट दिसून येते. वेळोवेळी इथे त्या सर्वांचा आढावा घेण्याचा मी नक्कीच प्रयत्न करेन. आपण सर्वांना राष्ट्रीय पर्यटन दिनाच्या शुभेच्छा देऊन हा लेख इथेच पूर्ण करतो.

Mahesh Tile

मी महेश टिळे, विज्ञान शाखेचा विद्यार्थी असलो तरी कर्मधर्मसंयोगाने कला-अध्यापक आहे. गेल्या १०-१२ वर्षांमध्ये कलाशिक्षक (Art Teacher), Animator, Programmer, Web-Developer इत्यादी क्षेत्राचा अनुभव घेऊन, आता तंत्रज्ञानासोबत पर्यटन आणि भारतीय संस्कृती या विषयामध्ये मी अभ्यास करीत आहे. अधिक वाचा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.